अलिबाग | भारतीय संस्कृती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या विचारांचा वारसा असलेल्या गणेशोत्सवाचा रचनात्मक उपयोग करत, रायगड जिल्ह्यात यंदाच्या उत्सवात ‘लोकसंवाद-२०२६’ हा उपक्रम राबविण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा महा-उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात आला.
गणेशोत्सवात शासकीय योजनांची माहिती
अलिबाग राजा गणेशोत्सव मंडळ, बिव्हळचाळ येथे आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. यामध्ये उत्पादन उद्योगासाठी १ कोटी रुपयांपर्यंत तर सेवा व कृषीपूरक व्यवसायांसाठी ५० लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना मिळणारे प्रोत्साहन व अनुदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मंडळाचे अध्यक्ष महेश कोटीयन उपस्थित होते. तसेच आदर्श मित्र मंडळ, घरत आळी, अलिबाग येथील गणेशोत्सवात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अभियानाची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने रायगड जिल्ह्यात १२ प्रमुख ठिकाणी भव्य रोजगार मेळावे आयोजित केले गेले. या मंडळाचे अध्यक्ष रविकिरण आंबेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
विविध लोकोपयोगी योजनांचा समावेश
या अभियानामुळे नागरिकांना महसूल विभागातील फेरफार, ऑनलाईन दाखले, ‘सेवा संकल्प’, नागरी सुविधा, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक शिष्यवृत्ती, सामाजिक न्याय व क्रीडा विभागाच्या योजना, ‘श्री गणेशा आरोग्याचा’ मोहीम आणि ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष’ यांची माहिती मिळाली. तसेच सायबर सुरक्षा, डिजिटल व्यवहार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि महिला व बालविकास विभागाच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, ‘Bappa.org’ हा डिजिटल मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा उपक्रम माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह विविध अधिकारी आणि गणेश मंडळांच्या सहकार्याने यशस्वी झाला.
Source: Cosmo News Desk











