सिंधुदुर्ग | शासकीय कामकाजात डिजिटल उपायांचा प्रभावी वापर, अचूक डेटा व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून माहितीचे विश्लेषण आणि आंतरविभागीय समन्वय बळकट करावा, असे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डिजिटल प्रणाली आणि सेवांचा निपटारा
शासकीय विभागांनी माहितीची अचूकता सुधारण्यावर विशेष लक्ष द्यावे. डिजिटल प्रणालीत माहिती नोंदवताना युनिक आयडेंटिफायर्सचा वापर करावा, जेणेकरून विश्लेषण सोपे होईल. नागरिकांच्या सेवेशी संबंधित प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावीत आणि सेवा विहित कालमर्यादेत मिळतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. भविष्यातील कामांचे नियोजन पूर्वतयारीने करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा, ज्यामुळे निर्णयप्रक्रिया अचूक होईल.
निधी खर्च आणि पायाभूत सुविधा
जिल्हा वार्षिक योजनांतर्गत मंजूर झालेला निधी निर्धारित कालमर्यादेत खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. मोबाईल नेटवर्कमधील अपुरी सुविधा असलेल्या डार्कस्पॉट क्षेत्रांची माहिती गोळा करून बीएसएनएल टॉवरसाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. महसूल विभागाने डॅशबोर्डवरील तांत्रिक अडचणी दूर करून सेवा वितरणाची गुणवत्ता वाढवावी.
Source: Cosmo News Desk









