नाशिक | ऑक्टोबर ९: नाशिक महानगरपालिकेने शहरातील विविध प्रभागांमधील ६७३ उद्यानांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी ३३ कोटी ७९ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा कामांच्या पार्श्वभूमीवर शहराचे सुशोभीकरण आणि हिरवाई जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रभागनिहाय निविदा प्रक्रिया सुरू मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सहाही प्रशासकीय विभागांतील प्रभाग क्रमांक १ ते ३१ मधील उद्यानांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. पंचवटी विभागात सर्वाधिक ८० विकसित आणि ८४ अविकसित उद्याने असून, या भागासाठी दोन वर्षांसाठी ८ कोटी ५४ लाखांचे प्राकलन तयार केले गेले आहे. तर पश्चिम विभागातील उद्यानांसाठी २ कोटी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
सुरक्षा व वृक्षसंवर्धनावर विशेष भर उद्यानांमधील पाण्याचा अपव्यय रोखणे, नियमित स्वच्छता राखणे आणि उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करणे ही कामे कंत्राटी पद्धतीने पार पाडली जातील. नगरसेवकांच्या तक्रारी आणि नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून वृक्षतोड रोखण्यासह नव्या रोपांची लागवड वेगाने केली जाईल. पुढील आठवड्यात या कामांच्या अंतिम निविदा प्रसिद्ध होणार आहेत.






