नाशिक | सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये घरफोडी, चोरी आणि पशुधन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वावी पोलिसांनी ग्राम रक्षक दलाच्या माध्यमातून विशेष मोहीम सुरू केली आहे. परिसरातील ३३ गावांमधील ३२७ तरुणांनी गावांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली असून, दररोज मध्यरात्री १२ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत गस्त घातली जात आहे. पूर्व भागातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वावी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी ग्राम रक्षक दल पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला, ज्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
३२७ तरुणांचा सहभाग आणि गस्त
गावातील महत्त्वाचे चौक, बाजारपेठा, वर्दळीची ठिकाणे, शेतशिवार आणि प्रवेशद्वारांवर ही गस्त घातली जात आहे. कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना या तरुणांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. डी. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक विमला एम. आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कांतिलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. ग्राम रक्षक दलातील तरुणांना पोलिसांकडून मार्गदर्शन केले जात असून, यात सरपंच आणि पोलिसपाटील यांचाही सक्रिय सहभाग आहे. पोलिस आणि जनता यांच्या समन्वयातून ग्रामीण भागातील सुरक्षा अधिक बळकट करण्याचा यामागे उद्देश आहे.
वावी गावातही ग्राम सुरक्षा दल
वावी गावातील तरुणांना एकत्र करून लवकरच ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात येणार आहे. तरुणांचे सहकार्य मिळाल्यास गावात चोरी व दहशतीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाईल, असे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ३३ गावांतील ३२७ तरुणांच्या सहभागामुळे या मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे. नागरिकांनी देखील पूर्णपणे सतर्क राहून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित वावी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Source: Cosmo News Desk








