नाशिक | सणासुदीच्या काळात टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ, पावसाची ओढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या २० किलोच्या टोमॅटो क्रेटसला अवघे १०० ते १२० रुपये मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी हाच दर ५० ते ६० रुपये होता, म्हणजेच प्रतिकिलो दर केवळ ५ ते ६ रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
वाढलेला लागवड खर्च आणि रोपांचे संकट
वणी व दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांची अर्थव्यवस्था टोमॅटो पिकावर अवलंबून आहे. पूर्वी ४० ते ५० पैशांना मिळणारी साधी रोपे अपेक्षित प्रमाणात टिकत नसल्याने आता वांग्याच्या खुंटावर तयार केलेल्या ग्राफ्टिंग रोपांचा वापर वाढला आहे. मात्र, या रोपांची किंमत ८ ते ९ रुपये असल्यामुळे लागवड खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच खते आणि औषधांच्या वाढत्या किंमतींची भर पडल्याने उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका
टोमॅटोचे उत्पादन आणि बाजारभाव यावर परिसरातील आर्थिक उलाढाल अवलंबून असते. भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा कमी येत असून, त्याचा परिणाम स्थानिक व्यापार, वाहतूक आणि मजुरीवरही होत आहे. त्यामुळे बाजारभावातील घसरणीचा फटका शेतकऱ्यांसह व्यापारी, वाहतूकदार, हमाल आणि शेतमजुरांना बसत आहे. शासनाने कृषी व महसूल विभागामार्फत गावनिहाय पीक परिस्थिती आणि पर्जन्यमानाची संयुक्त पाहणी करून दुष्काळसदृश स्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि नियमानुसार मदतीसाठी कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
Source: Cosmo News Desk







