नाशिक : राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान लवकरच दिले जाईल, अशी महत्त्वाची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत या अनुदानाची तरतूद करण्यात आली असून, यामुळे राज्यातील सुमारे २० लाख नियमित कर्जदार शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषिथॉन २०२६ प्रदर्शनात घोषणा
येथील १९ व्या आंतरराष्ट्रीय ‘कृषिथॉन २०२६’ प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि. २६) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन सोऱ्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली. मंत्री भरणे यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे ३० लाख शेतकऱ्यांचे कर्ज हे दोन लाख रुपयांच्या आतील आहे. यामध्ये प्रामाणिकपणे व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २० लाखांच्या घरात आहे.
कर्जाची नियमानुसार परतफेड करणाऱ्या या प्रामाणिक शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगत त्यांनी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या तरतुदीनुसार या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान वाटप करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच अत्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असा विश्वास व्यक्त केला.
शेतीच्या वीजपुरवठ्याबाबत भूमिका
शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्याबाबत बोलताना मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करणे शक्य नाही. मात्र असे असले तरी, राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला याचा त्रास होणार नाही याची पुरेशी काळजी महावितरणने घ्यावी, अशा सक्त सूचना महावितरणला देण्यात आल्या आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Source: Cosmo News Desk







