नाशिक | नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसराजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण १३ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणूक आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
छापा मारण्याची गोपनीय कारवाई
गुन्हे शाखा युनिट-१ मधील हवालदार संदीप भांड आणि उत्तम पवार यांना तेरा नोव्हेंबर रोजी नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या ठिकाणी संतोष गुदणे, भुय्या मामू उर्फ फिरोज, अशफाक शेख, शब्बीर आणि हुसेन हे आपल्या साथीदारांच्या मदतीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांना दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवत होते. नागरिकांना ‘काला पिला’ नावाचा जुगार खेळण्यास प्रवृत्त करून हातचलखीने आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
प्रवाशांच्या वेषात सापळा आणि जप्ती
पोलीस उपनिरीक्षक रमीज शेख यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करून पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी वेशंतर करून रेल्वेस्थानक परिसर, बसस्थानक, हॉटेल आणि घटनास्थळाच्या आजूबाजूला सापळा रचला होता. प्रवाशांच्या वेषात असलेल्या पोलिसांनी जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकून १३ जणांना बेड्या ठोकल्या. या धडक कारवाईत जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह एकूण तीन लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमीज शेख यांच्यासह गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पूर्ण केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-१ कडून सुरू आहे.
Source: Cosmo News Desk







