नाशिक | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. मालेगाव स्टँड ते रामकुंड रस्त्यावरील सर्व अतिक्रमणांवर महापालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रमुख मार्गावरील टपऱ्या, पत्राचे शेड आणि लोखंडी रेलिंग हटवून पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने रस्ते मोकळे केले आहेत.
रस्त्यावरील अतिक्रमणे आणि अनधिकृत जाळ्या निष्कासित
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्यामुळे शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतुकीस अडथळामुक्त ठेवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या उपस्थितीत ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान मडकी विक्रेत्यांनी थाटलेल्या तात्पुरत्या टपऱ्या, पत्राचे शेड आणि लोखंडी जाळ्या हटवण्यात आल्या.
तसेच इंद्रकुंड परिसरातील रस्त्यालगत उभारलेली अनधिकृत रेलिंग आणि लगतच्या इमारतींना लावलेल्या बेकायदेशीर जाळ्या जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आल्या. या कारवाईमुळे परिसरातील रस्ते मोकळे झाले असून वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात मोहीम संपन्न
कार्यकारी अभियंता प्रशांत पगार आणि पंचवटी विभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पंचवटी विभागाचे गाडीप्रमुख प्रवीण बागूल, उमेश खैरे, नंदू खांडरे, दत्ता आहेर, राजू साळुंखे, जावेद शेख, जगन्नाथ सागर, कटले, विजय गरूड यांच्यासह मनपाचे कर्मचारी व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
Source: Cosmo News Desk







