नाशिकरोड परिसरातील एका तरुणावर प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील एका संशयिताला गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. आकाश अंबादास कांगुणे (वय २४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याला एकलहरे परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
काय आहे नेमकी घटना?
फिर्यादी पूनम सौदे यांच्या मुलाशी म्हणजेच यश याच्याशी परिसरात राहणारी एक महिला प्रेमसंबंध ठेवण्यास इच्छुक होती. ती त्याला वारंवार फोन करून संपर्क साधत असे. मात्र, यश याने तिच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून ११ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश कांगुणे, आकाश कांगुणे आणि इतरांसह संबंधित महिलेने फिर्यादीच्या घरी जाऊन वाद घातला होता. या वादादरम्यान आकाश कांगुणे याने यशला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
गुंडाविरोधी पथकाची कारवाई
या मारहाणीच्या घटनेप्रकरणी १२ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्ह्यातील फरार संशयित आकाश कांगुणे हा एकलहरे परिसरात असल्याची गोपनिय माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला उपनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही धडक कारवाई गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार, तसेच अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांच्या पथकाने पार पाडली.
Source: Cosmo News Desk







