नाशिक | मध्य प्रदेशातील खरगोन येथे झालेल्या ४.५ रिक्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के हतनूर धरण परिसरासह जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये जाणवले आहेत. या घटनेनंतर उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हतनूर धरणावर आजतागायत कोणतीही स्वतंत्र भूकंपमापक यंत्रणा कार्यान्वित नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धरणासारख्या मोठ्या प्रकल्पांवर भूकंपाची तीव्रता मोजणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्यामुळे जलसंपदा विभागाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
धरणाचे महत्त्व आणि सिंचन व्यवस्था
तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर हतनूर धरण स्थित आहे. या धरणावर भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर आणि अमळनेर या सहा तालुक्यांतील सुमारे ४० हजार हेक्टर शेतीचे सिंचन अवलंबून आहे. तसेच या भागातील पिण्याचे पाणी आणि दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे भवितव्य सुद्धा याच धरणावर अवलंबून आहे. हतनूर धरण परिसर हा सातपुड्याच्या पायथ्याशी आणि मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागाला लागून आहे.
प्रशासन आणि मेरी संस्थेवर अवलंबित्व
धरणावर स्वतःचे भूकंपमापक यंत्र उपलब्ध नसल्यामुळे भूकंपाचा धक्का नेमका किती तीव्रतेचा होता, याचा अधिकृत तपशील धरण प्रशासनाकडे नसतो. परिणामी, प्रत्येकवेळी नाशिक येथील ‘मेरी’ संस्थेच्या नोंदीवरच अवलंबून राहावे लागते. धरणाची भिंत आणि दरवाजांवर भूकंपाच्या लहरींचा नेमका काय परिणाम होतो, हे तांत्रिकदृष्ट्या तपासण्यासाठी ‘सिस्मोग्राफ’ यंत्रणा अत्यंत आवश्यक मानली जाते. हतनूर धरणात आधीच मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असून अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात अचूक नोंदी उपलब्ध नसणे धोक्याचे ठरू शकते. हतनूर धरणाचे अभियंता एम. एल. पाटील यांनी, धरणावर भूमापन केंद्र असले तरी त्यातून कोणतीही माहिती मिळत नसल्याचे स्पष्ट केले असून प्रशासनाकडे यंत्राची मागणी केल्याचे सांगितले आहे.
Source: Cosmo News Desk










