नाशिक | आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. सिंहस्थ कुंभमेळा आणि ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे शहराकडे होणारे लोंढे लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाकडे ८,२५० दलघफू पाण्याचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागाकडून ६,३०० दलघफू पाणी आरक्षित करण्याची तयारी दर्शवली असली, तरी प्रत्यक्षात मिळणारे ५,५०० दलघफू पाणी शहराच्या गरजेच्या तुलनेत अपqर ठरणार आहे.
पाण्याची मागणी आणि जलसंपदा विभागाची भूमिका
नाशिक शहराला गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा महापालिकेने एकूण ७,३७० दलघफू पाणी आरक्षित करण्याची मागणी केली होती. मात्र, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाने ही मागणी पूर्ण करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले. बाष्पीभवनासह ६,३०० दलघफू पाणी आरक्षित करता येईल आणि प्रत्यक्ष वापरासाठी ५,५०० दलघफू पाणी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. यामुळे महापालिकेच्या मागणीत २५ टक्के कपात होण्याची शक्यता असून ही बाब चिंताजनक मानली जात आहे.
२००९ च्या कराराचा आधार आणि वाढीव मागणी
पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी महापालिका आता २००९ मध्ये राज्य शासन आणि महापालिकेत झालेल्या पाणी कराराचा आधार घेत आहे. या करारानुसार सुमारे सात हजार दलघफू पाणी आरक्षित ठेवणे निश्चित झाले होते. यावर आधारित अतिरिक्त १,२५० दलघफू पाण्याची मागणी केली जाणार असून एकूण ८,२५० दलघफू पाण्यासाठी प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली. शहरात भाविकांची वाढती संख्या, स्थलांतर आणि लोकसंख्येतील अंदाजे तीन लाखांची वाढ यामुळे पाण्याची गरज वाढणार आहे. तसेच हिवाळ्यातच पाण्याची मागणी वाढल्याने सध्या ६१० दशलक्ष लिटर पाणी उचलावे लागत आहे.
Source: Cosmo News Desk







