Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • अर्बन चॅलेंज फंडमध्ये नाशिक देशात प्रथम; चार प्रकल्पांना मंजुरी
Nashik

अर्बन चॅलेंज फंडमध्ये नाशिक देशात प्रथम; चार प्रकल्पांना मंजुरी

नाशिक | केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ अंतर्गत प्रकल्पांच्या मंजुरी आणि अंमलबजावणीमध्ये नाशिकने देशात आघाडी घेतली आहे. देशातील मंजूर ३३ प्रकल्पांमध्ये नाशिक महापालिकेच्या चार प्रकल्पांचा समावेश असून, या प्रकल्पांची जवळपास ३० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. निधी मिळवण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करताना प्रत्यक्ष कामे केल्यामुळे नाशिकने देशातील शहरांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. नोव्हेंबरअखेर महापालिकेला सुमारे ५१ कोटी रुपयांचा निधी मिळणार असून, सर्व प्रकल्प मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चार प्रकल्पांचा समावेश आणि कामांची प्रगती

नाशिक महापालिकेने या योजनेअंतर्गत थेट पाइपलाइन व पाणी शुद्धीकरण केंद्र, क्लीन गोदावरी मिशन, रामकाल पथ पुनर्विकास आणि बायो पॉवर जनरेशन प्लांट या चार प्रकल्पांचा समावेश केला आहे. यामध्ये थेट पाइपलाइन व पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा एकूण खर्च ४०० कोटी रुपये असून १०० कोटींचा निधी मिळणार आहे आणि याचे ३२ टक्के काम पूर्ण झाले आहे. क्लीन गोदावरी मिशनचा खर्च २२५ कोटी रुपये असून ५५ कोटींचा निधी मिळणार असून याचे २५ टक्के काम झाले आहे. रामकाल पथ पुनर्विकास (फेज-२) चा खर्च ६२.५१ कोटी रुपये असून १५.६३ कोटींचा निधी मिळणार असून याचे ५० टक्के काम झाले आहे. बायो पॉवर जनरेशन प्लांटचा खर्च १० कोटी रुपये असून १.२५ कोटींचा निधी मिळणार आहे आणि याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

पायाभूत विकासाला मिळणार चालना

केंद्र सरकारने २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठी देशातील शहरांच्या पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडची घोषणा केली आहे. या योजनेसाठी एक लाख कोटी रुपयांची केंद्रीय मदत उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यातून शहरी भागात चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून २५ टक्के निधी दिला जाणार आहे. यापूर्वीच बॉंडच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये उभारल्याने केंद्राच्या निधी उभारणीविषयक अटींची पूर्तता करणे शक्य झाले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, शहरी वाहतूक आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पांना मिळालेली मंजुरी नाशिकच्या पायाभूत विकासासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts