Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नका: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
Maharashtra

शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नका: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना

मुंबई | शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा गंभीर विचार करून फायनान्स कंपन्यांनी वाहने किंवा इतर कोणत्याही स्वरूपाच्या कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावू नये, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे दिले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या वाहनांच्या वसुलीसाठी होत असलेल्या तगाद्याबाबत शासनाने कारवाई केली असल्याचे त्यांनी नमूद केले. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्यासोबत बैठका झाल्या असून, हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करून योग्य तोडगा काढतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दुष्काळ मदत आणि पाणीटंचाईबाबत आढावा

इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथील लावंड वस्तीवर शेतकरी हनुमंत लावंड यांच्या घरी भेट देऊन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जनावरे व शेळ्यांच्या गोठ्याची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच परिसरातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीचे पंचनामे आणि पाणी उपलब्धतेच्या नियोजनाचा आढावा घेतला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितले की, पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर झाल्यामुळे आतापर्यंत ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे ४ हजार ३७२ कोटी रुपयांची अग्रिम मदत वाटप करण्यात आली आहे. उरलेल्या शेतकऱ्यांना देखील पुढील दोन-तीन दिवसांत ही मदत मिळवून दिली जाईल. ही केवळ अग्रिम मदत असून यापुढेही शासनाकडून मदत केली जाणार असून केंद्र सरकारने एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांत भरीव वाढ केल्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. नीरा नदी व कालव्यांतून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी अत्यंत रास्त असून यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.

कर्जमाफी आणि इतर शेतकरी कल्याणकारी योजना

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत माहिती देताना कृषिमंत्री म्हणाले की, आतापर्यंत चार टप्प्यांमध्ये तब्बल २० लाख ७२ हजार २५० शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. यासोबतच दोन लाखांपर्यंतच्या कर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम वेगाने सुरू असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. याशिवाय शेततळी, गाळ काढणे, मोफत बियाणे आणि वीजबिल सवलत यांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम शासन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts