सिंधुदुर्ग | आदिवासी समाजाचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास साधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’ च्या अनुषंगाने कणकवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर आणि सहायक प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात हा सप्ताह आयोजित करण्यात आला असून, या माध्यमातून शासकीय सेवा, आरोग्य सुविधा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या ०.८२ टक्के असून यात कातकरी आणि ठाकर या प्रमुख जमातींचा समावेश आहे.
योजनांची अंमलबजावणी आणि वस्ती विकास
आदिवासी वस्ती विकासासाठी ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजनेंतर्गत २०२३-२४ मध्ये १९.९६ लाख, तर २०२४-२५ मध्ये ३२.८३ लाख रुपये खर्च झाले आहेत. २०२५-२६ साठी ४४.७७ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळालेली असून कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच शबरी आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील २९ आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल मिळाले आहे. २०२६-२७ साठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये पर्यटन क्षेत्रात विक्रीसाठी पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये, गावठी कुक्कुटपालनासाठी तीन महिलांना, मासळी विक्रीसाठी १० महिलांना आणि महिला बचत गटाला काजू प्रक्रिया यंत्रासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. स्वच्छता मोहीम, आधारकार्ड व शासकीय दाखले वाटप, महिलांविषयक कायद्यांचे मार्गदर्शन आणि जलजागृती अभियान राबवले जात आहे.
सप्ताहातील आगामी उपक्रम आणि आवाहन
सप्ताहाचे आयोजन करताना १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रम झाले. १६ नोव्हेंबर रोजी देवगड, मालवण आणि वेंगुर्ला येथे आधारकार्ड व शासकीय दाखले सेवा शिबिरे तसेच महिलांचे संरक्षण, बालविवाह व बालमजुरी प्रतिबंधक मार्गदर्शन आयोजित केले आहे. १७ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला, कुडाळ आणि देवगड येथे आरोग्य शिबिरे होणार आहेत. १८ नोव्हेंबर रोजी शासकीय योजनांची माहिती आणि जलजागृती अभियानाद्वारे सप्ताहाची सांगता होईल. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पेण हे नोडल कार्यालय म्हणून काम पाहत आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी तरुणांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
Source: Cosmo News Desk











