छत्रपती संभाजीनगर | राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव आणि कन्नड तालुक्यातील मेहगाव येथील विविध जलसंधारण प्रकल्पांची पाहणी केली. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण उपाययोजनांच्या अनुषंगाने या प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. या दौऱ्यात गल्लेबोरगाव येथील द्वारयुक्त सिमेंट नाला बांध, मेहगाव येथील पूलवजा बंधारा तसेच पाझर तलाव क्रमांक १ या प्रकल्पांचा समावेश होता. या वेळी पूलवजा बंधाऱ्याचे लोकार्पणही मंत्री राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या दौऱ्यात आमदार विलास भुमरे, आमदार संजना जाधव यांच्यासह मुख्य अभियंता हरिभाऊ गिते, कार्यकारी अभियंता नरेंद्र कटके आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
गल्लेबोरगाव व मेहगाव येथील जलसंधारण प्रकल्प
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे चिंचोली नाल्यावर द्वारयुक्त सिमेंट नाला बांध उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्याची लांबी २० मीटर व उंची २.५ मीटर असून, याची एकूण किंमत ८० लाख ८५ हजार रुपये आहे. या प्रकल्पाच्या पाणी साठवण क्षमतेमुळे परिसरातील १६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून भूजल पुनर्भरणास चालना मिळणार आहे. तसेच कन्नड तालुक्यातील मेहगाव येथील पाझर तलाव क्रमांक १ चीही मंत्र्यांनी पाहणी केली. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत प्रेरणा फाउंडेशनमार्फत या तलावातून सन २०२३-२४ मध्ये २२ हजार ७३३ घनमीटर आणि सन २०२४-२५ मध्ये ११ हजार ४६० घनमीटर असा एकूण ३४ हजार १९३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित झाली असून शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली आहे.
मेहगाव येथील पूलवजा बंधाऱ्याचे लोकार्पण
कन्नड तालुक्यातील मेहगाव येथील अंजना नदीवर उभारण्यात आलेल्या पूलवजा बंधारा क्रमांक १ चे लोकार्पण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या निधीतून मृद व जलसंधारण विभागामार्फत हा प्रकल्प उभारण्यात आला असून, त्यासाठी १ कोटी ६८ लाख ६२ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. सन २०२५-२६ मध्ये पूर्ण झालेल्या या पुलाच्या स्लॅबची लांबी ३१ मीटर व रुंदी ६ मीटर आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ९८.५७ हजार घनमीटर असून सिंचन क्षमता ३२ हेक्टर आहे. या पूलवजा बंधाऱ्यामुळे शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला असून दळणवळण व सिंचनाची सुविधा सुलभ झाली आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन आणि जलस्रोतांच्या बळकटीकरणासाठी हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
Source: Cosmo News Desk











