Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • यवतमाळमधील बाधित शेतकऱ्यांसाठी ३१.५८ कोटींचा निधी मंजूर
Maharashtra

यवतमाळमधील बाधित शेतकऱ्यांसाठी ३१.५८ कोटींचा निधी मंजूर

यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करणारे शेतकरी

यवतमाळ | जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून ३१.५८ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने २ नोव्हेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या निधीमुळे जिल्ह्यातील अंदाजे ४१ हजार ६२० बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शासन स्तरावर केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार हा निधी पात्र शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांतील एकूण २ लाख १५ हजार ४९५ बाधित शेतकऱ्यांसाठी सुमारे २०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या सर्व जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

निधीचे वितरण आणि शेतीपिकांचे नुकसान

मंजूर करण्यात आलेल्या एकूण निधीपैकी ३०.०२ कोटी रुपयांची रक्कम शेतीपिकांच्या नुकसानीसाठी आहे, तर १.५६ कोटी रुपयांचा निधी शेतजमिनीच्या नुकसानीसाठी वितरित केला जाणार आहे. शासन निर्णयानुसार, ही मदत थेट लाभ हस्तांतरण प्रणालीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शेतजमिनीच्या नुकसानीसाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विहित दराने जास्तीत जास्त २ हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळणार आहे. चालू हंगामात यापूर्वी पिकांच्या नुकसानीसाठी देण्यात आलेल्या निधीमध्ये या प्रस्तावातील मागणीचा समावेश नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका हंगामात एकच वेळ विहित दराने मदत दिली जात असल्याची खात्री करावी, तसेच तहसीलदारांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने मदतीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कटाक्षाने काळजी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

निकासांचे पालन व बँकांसाठी निर्देश

हा निधी खर्च करताना सर्व संबंधित शासन निर्णयातील सूचनांचे आणि निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या कारणासाठी निधी मंजूर झाला आहे, त्याच कामासाठी तो खर्च करावा आणि नैसर्गिक आपत्तीसाठीच्या सर्व अटी पूर्ण होत असल्याची खात्री करावी. मदत वाटपाचे काम पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा लागणार आहे. या आदेशाद्वारे किंवा यापूर्वीच्या आदेशांद्वारे दिलेला निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी वळता करू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक सूचना द्याव्यात, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

Source: Cosmo News Desk

Related Posts