मुंबई | राज्य शासनाने दुष्काळी घोषित केलेल्या ३०४ तालुक्यांमधील मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलाशय आणि तलावांमधील लागवडीयोग्य गाळपेरा क्षेत्र शेतकरी आणि पशुपालकांना अल्पकालीन चारा पिकांच्या लागवडीसाठी भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी याबाबतची माहिती दिली असून, या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांच्या आधारे हे तालुके दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागातील जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी मृद व जलसंधारण विभागाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी तांत्रिक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, गाव तलाव आणि माजी मालगुजारी तलाव आदी जलसाठ्यांना लागू राहतील.
लागवडीसाठी निकष आणि प्रतिबंधित क्षेत्र
जलाशयाची पूर्ण संचय पातळी आणि प्रत्यक्ष जलपातळी यांदरम्यान उघडे पडलेले लागवडीयोग्य क्षेत्रच गाळपेरा क्षेत्र म्हणून निश्चित केले जाईल. धरणाच्या मातीच्या भिंतीच्या जलाशयाकडील पायथ्यापासून किमान ५० मीटर, सांडवा व त्याच्या प्रवेशमार्गापासून किमान ३० मीटर तसेच विमोचक, इनटेक विहीर, जॅकवेल, गेज पोल आणि बेंचमार्कच्या सभोवतालचे किमान ३० मीटर क्षेत्र प्रतिबंधित राहील. पिण्याच्या पाण्याच्या उद्भव विहीर किंवा जॅकवेलच्या २०० मीटर परिसरात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर असलेल्या लागवडीला परवानगी मिळणार नाही. महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि मृद व जलसंधारण विभागांचे अधिकारी संयुक्त सर्वेक्षण करून गाळपेरा उपलब्धता अहवाल तयार करतील. संबंधित कार्यकारी अभियंता हा अहवाल शासन निर्णयाच्या दिनांकापासून १५ दिवसांत जिल्हास्तरीय समितीला सादर करतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रकल्पनिहाय उपलब्ध क्षेत्राचा आढावा घेऊन वाटपाला मान्यता देईल आणि लाभार्थी निवडेल.
पिकांचे प्रकार आणि अटी
या क्षेत्रात मका, ज्वारी, बाजरी, न्यूट्रीफीड, बरसीम, ओट आदी चारा पिके घेता येतील. मुरघासासाठी मका आणि ज्वारीला प्राधान्य देण्यात आले आहे. ऊस, फळपिके, बहुवार्षिक पिके तसेच अन्नधान्य किंवा नगदी पिके घेण्यास परवानगी असणार नाही. लाभार्थ्यांना पीक काढणी पूर्ण करून ३१ मे २०२७ पूर्वी जमीन विभागाच्या ताब्यात परत करावी लागेल. पाणीपातळी वाढल्यामुळे उभे पीक बुडाल्यास नुकसानभरपाई मिळणार नाही. जमिनीची मशागत कमाल २० सेंटीमीटर खोलीपर्यंत करता येईल. गाळ, माती, मुरूम किंवा वाळूचे उत्खनन, नवीन विहीर, बोअरवेल, खड्डे किंवा चर खोदणे, बांधकाम, कुंपण, रस्ता आणि वृक्षलागवड करण्यास मनाई राहील. तहसीलदार उपलब्ध क्षेत्र, भाडेपट्ट्याचा कालावधी, भाडेदर आणि अर्जासाठी किमान १५ दिवसांची मुदत गावचावडी, ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालयात प्रसिद्ध करतील. इच्छुक व्यक्ती किंवा सहकारी संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करावा, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
Source: Cosmo News Desk











