मुंबई | पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या २१ योजनांचा ऑनलाइन पोर्टलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या महिन्यात शुभारंभ करण्यात येणार आहे. मंत्रालयात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एन. रामस्वामी, सहआयुक्त तसेच विविध अधिकारी उपस्थित होते. शेळी-मेंढी गटांचे वाटप, दुधाळ गायी-म्हशींचे संगोपन आणि कुक्कुटपालन यांसारख्या विविध व्यवसायांसाठी या योजनांमधून निधी व शासनाचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असून याद्वारे शेतकरी, बेरोजगार युवक-युवती आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी मिळणार आहेत.
ऑनलाइन पोर्टलची सुविधा आणि अर्ज प्रक्रिया
पशुसंवर्धन विभागाने महाआयटीच्या समन्वयातून हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. इच्छुक अर्जदारांना ‘महा आयडी’ तयार करून या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार असून पोर्टलवर मराठीतूनही अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य शासन नऊ योजना, जिल्हा वार्षिक योजनेतील नऊ योजना आणि अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून तीन योजनांसाठी निधी दिला जाणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, भज-क प्रवर्गासाठीच्या योजनांचाही समावेश आहे.
विविध राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजना
विभागाच्या वतीने सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली. राज्यस्तरीय योजनांमध्ये पाच दुधाळ गायी किंवा म्हशींचा प्रकल्प, ५० शेळ्या किंवा मेंढ्या व पाच नरांचा प्रकल्प, पाच हजार अंडी देणाऱ्या कुक्कुट पक्ष्यांचा प्रकल्प, तीन हजार ते पाच हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांचा प्रकल्प, आठवड्याला एक हजार अंडी उबविण्याची क्षमता असलेले यंत्र, पाच माद्या व एक नर यांचा वराहपालन गट, मुरघास संयंत्र आणि पशुसंवर्धन कर्जावरील व्याज सवलतीचा समावेश आहे. जिल्हा वार्षिक योजनांमध्ये एक किंवा दोन दुधाळ जनावरांच्या गटाचे वाटप, पाच शेळ्या किंवा मेंढ्या व एक नर तसेच दहा शेळ्या किंवा मेंढ्या व एक नर अशा गटांचे वाटप, ५०० कुक्कुट पक्ष्यांचे वाटप, हायड्रोपोनिक चारा उत्पादन आणि मिनी टीएमआर उपकरणासाठी अनुदानाचा समावेश आहे. तसेच अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या योजनांमध्ये राजे यशवंतराव होळकर महामेष योजना आणि चराई यांचा समावेश आहे.
Source: Cosmo News Desk











