नाशिक | विंचूर शहराची वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि औद्योगिक विकास यामुळे नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर कोणतेही प्रभावी नियंत्रण नसल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने धोकादायक ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी जोरदार मागणी विंचूर ग्रामस्थांकडून होत आहे.
महामार्गावर वेगामुळे वाढलेला धोका
या महामार्गावरून अवजड वाहने, खासगी वाहने, दुचाकी, चारचाकी आणि प्रवासी वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. महामार्गावरून जाणारी अनेक वाहने भरधाव असल्याने रस्ता ओलांडताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. विशेषतः महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांचा वेग कमी होत नसल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांची प्रशासनाकडे प्रमुख मागणी
विंचूरमधील कांदा मार्केट परिसर, एमआयडीसी सर्कल, पुलाजवळील परिसर तसेच इरिगेशन कॉलनीजवळील रस्ता ही ठिकाणे नागरिकांच्या दृष्टीने अधिक धोकादायक ठरत आहेत. या ठिकाणी कांदा मार्केटमुळे शेतकरी, व्यापारी, हमाल आणि वाहनचालकांची मोठी गर्दी असते. एमआयडीसी परिसरात कामगारांची ये-जा सुरू असते. प्रशासनाने वाहतुकीचे सर्वेक्षण करून योग्य त्या ठिकाणी नियमानुसार गतिरोधक, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था आणि रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसणारे रस्ते चिन्हे बसवावीत, अशी मागणी माजी सरपंच सचिन दरेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर जेऊघाले यांनी केली आहे.
Source: Cosmo News Desk





