मुंबई | जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पा’च्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि पर्यावरण सल्लागार कंपन्यांच्या निवडीला मंजुरी देण्यात आली आहे. पारंपरिक वाहतूक व्यवस्थेला कार्यक्षम, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक पर्याय देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत हा प्रकल्प हाती घेतला आहे. कोची मेट्रो रेल लिमिटेडच्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.
प्रकल्पाचे स्वरूप आणि टप्पा पहिला
पहिल्या टप्प्यामध्ये ८ विद्यमान आणि ९ नवीन अशा एकूण १७ जलमार्गांवर २६ प्रवासी टर्मिनल विकसित किंवा श्रेणीसुधारित केले जाणार आहेत. तसेच आवश्यक नौवहनविषयक आणि आपत्कालीन पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसह लगतच्या परिसरातील प्रवाशांना आधुनिक जलवाहतूक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात एकात्मिक आणि शाश्वत प्रवासी जलवाहतूक जाळे तयार करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सल्लागार कंपन्यांची नियुक्ती आणि जबाबदाऱ्या
महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रकल्प व्यवस्थापन, रचना, खरेदी सहाय्य आणि पर्यवेक्षणासाठी निविदा प्रक्रिया राबवून ‘मे. टिप्सा इंडिया प्रा. लि.’ आणि ‘रिना कन्सल्टिंग एसपीए’ या संयुक्त उपक्रुमाची सर्वोच्च गुणांकित निविदाधारक म्हणून निवड केली आहे. हे सल्लागार सविस्तर अभियांत्रिकी व रचना, कामाचे आराखडे, निविदा कागदपत्रे, खरेदी प्रक्रियेस सहाय्य, बांधकाम पर्यवेक्षण, गुणवत्ता नियंत्रण आणि प्रकल्प देखरेख पाहणार आहेत. तसेच, पर्यावरणीय नियमांचे पालन आणि वैधानिक मंजुरीसाठी ‘मे. बिल्डिंग एन्व्हायर्नमेंट इंडिया प्रा. लि.’ या कंपनीची पर्यावरण सल्लागार म्हणून निवड करण्यात आली असून ही कंपनी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, आराखडा, सागरी किनारा नियंत्रण क्षेत्र व पर्यावरणीय मंजुरी, वन आणि संवेदनशील क्षेत्रासंबंधी मंजुरी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानग्या मिळवण्यासाठी तांत्रिक सहाय्य देणार आहे.
Source: Cosmo News Desk











