Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • जालना जिल्ह्यात शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविणार
Maharashtra

जालना जिल्ह्यात शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविणार

जालना जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा बैठक घेताना पालकमंत्री पंकजा मुंडे व अधिकारी

मुंबई | जालना जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात विविध शासकीय यंत्रणांनी मंजूर विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. तसेच सर्व योजनांची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.

विकासकामांचा आढावा व वीज व्यवस्था बळकट करणे

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात हाती घेण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी उपकेंद्रे, ट्रान्सफॉर्मर आणि रोहित्रांची क्षमता वाढविण्यासह विविध महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. या कामांमुळे दुष्काळी परिस्थितीत मोठा दिलासा मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच सौर हायमास्ट उभारणीसाठी देखील निधीची तरतूद केली जात आहे.

विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद आणि निर्देश

जिल्ह्यातील विकासकामांसाठी मिळालेला निधी अखर्चित राहू नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत. जिल्हा जलसंधारण विभागाचा निधी खर्च न होणे गंभीर असून, निधी परत जाऊ नये म्हणून प्रशासकीय मान्यता वेळेत मिळावी यासाठी तातडीने कार्यवाही करावी. नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नगरपरिषद क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयांची उभारणी आणि शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रमासाठी १५ कोटी ६६ लक्ष रुपयांची तरतूद झाली आहे. दिव्यांग कल्याणासाठी ४ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद असून गरजू दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा व साहाय्यभूत साधने मिळणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी रेशीम उद्योगातून साडीनिर्मिती व्यवसाय उभारण्यास मदत करण्याचे निर्देश देण्यात आले असून दुष्काळी परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रे व शाळांच्या दुरुस्ती कामांना अडसर येणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Source: Cosmo News Desk

Related Posts