मुंबई | गोंदिया जिल्ह्यातील कुडवा येथील पालावरच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीतील मांग गारुडी समाजाच्या ३० मुलामुलींनी लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी राज्यपालांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. पालकांच्या रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी विदर्भात पालावरची शाळा चालवली जाते. भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र आणि भटके विमुक्त कल्याणकारी परिषद, विदर्भ प्रांत यांच्या माध्यमातून या विशेष भेटीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मुंबईत नेहरू विज्ञान केंद्र, सिद्धिविनायक मंदिर आणि विधान भवन पाहिले असून येथून पाहिलेला समुद्र सर्वांना खूप आवडल्याची माहिती राज्यपालांना दिली.
भटक्या विमुक्त मुलांचे राज्यपालांसमोर शिक्षण आणि उपक्रमांचे प्रदर्शन
भेट दिलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी राज्यपालांसमोर भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय पाठ म्हणून दाखवला. मुलांच्या पाठांतराबाबत आणि उच्चाराबाबत राज्यपालांनी त्यांचे कौतुक केले. भटके विमुक्त विकास परिषद ही संस्था भटक्या विमुक्त जमातीतील मुलांच्या शिक्षणातून जीवनदान देण्याचे राष्ट्रकार्य करत असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी काढले. संस्थेचे शिक्षा आयाम प्रमुख प्रशांत सुरेश बोरसे यांनी राज्यपालांना पालावरची शाळा उपक्रमाची माहिती दिली. पालकांच्या रोजगारासाठी गोंदिया येथून छत्तीसगड, ओडिसा, हरियाणा, पंजाब आणि काश्मीरपर्यंत स्थलांतर होत असल्याने मुले शिक्षणापासून वंचित राहतात व व्यसनांच्या आहारी जातात, म्हणूनच हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यपालांच्या महत्त्वाच्या सूचना आणि मुलांचे संगोपन
भटक्या विमुक्त जमातीच्या मुलामुलींना केवळ शिक्षण व संस्कारच नव्हे, तर रोजगारोन्मुख प्रशिक्षणही देण्यात यावे, अशी महत्त्वाची सूचना राज्यपालांनी यावेळी दिली. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम अभ्यास करून आपले भविष्य बनवावे असा सल्ला त्यांनी दिला. तसेच आगामी सुट्ट्यांमध्ये या मुलांना पुणे दर्शन घडविण्याबाबत सूचना करू, असेही राज्यपाल म्हणाले. दरम्यान, मुलामुलींना अभ्यास व शिस्तीसोबतच खर्रा न खाण्याची, जुगारासाठी पत्ते न खेळण्याची तसेच चांगले नागरिक बनण्याची शपथ दिली जाते, अशी माहिती प्रशांत बोरसे व उर्मिला बोरसे यांनी दिली. तसेच मुलांना भगवद्गीतेचे अध्याय शिकवण्यासह दररोज खेळ खेळण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
Source: Cosmo News Desk











