महाराष्ट्र | महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षण, समता, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता आणि शोषितांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला असून, त्यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण केले जात आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आणि परिवर्तनवादी विचारांचा आढावा घेतला. सूत्रसंचालक प्रणय जयश्री कैलास चव्हाण यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याबरोबरच शिक्षण, शेतकरी कल्याण, दुष्काळ निवारण आणि सामाजिक न्यायाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला.
स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ आणि सामाजिक सुधारणा
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यक्रांती घडवली, तर महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्रांती घडवली, असे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. तत्कालीन समाजव्यवस्थेत बहुजन समाजातील मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित होता. या परिस्थितीत शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे ओळखत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. या निर्णयाला तीव्र सामाजिक विरोध झाला, तरीही त्यांनी शिक्षणाचा प्रसार सुरूच ठेवला. महिलांना आत्मसन्मान आणि समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी हा लढा महत्त्वपूर्ण ठरला. तसेच विधवा महिलांना आधार देण्यासाठी आणि बालहत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केले. अस्पूृश्य समजल्या जाणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून त्यांनी आपल्या पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला.
साहित्य, शेतकरी कल्याण आणि विचारांची प्रासंगिकता
महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथांच्या माध्यमातून विषमता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मांडणी केली. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेतून त्यांनी समतेच्या चळवळीला संघटित स्वरूप दिले. सर्व घटकांना समान शिक्षण मिळावे आणि वयाच्या १४ वर्षांपर्यंत शिक्षण सक्तीचे असावे, अशी मागणी त्यांनी केली होती. शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी दुष्काळकाळात मदतकार्य केले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक आधार, बियाणे, कर्जमाफी आणि पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले. महात्मा फुले यांनी मांडलेले विचार आजही तितकेच गरजेचे असून, समता, शिक्षण, विवेक आणि मानवतेची मूल्ये प्रत्यक्ष जीवनात रुजविण्याचा संकल्प करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.
Source: Cosmo News Desk











