मुंबई | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने आणि कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयात येवला आणि निफाड तालुक्यांतील पाणीपुरवठा योजना, साठवण तलाव, जलसंधारण तसेच नदी संवर्धन प्रकल्पांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन यंत्रणांनी अधिक जबाबदारीने काम करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करून कृती कार्यक्रम राबवावा, जेणेकरून येत्या दुष्काळी संकटाचा सामना करून जनतेला पाणी उपलब्ध करून देता येईल, असे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले.
पाणीपुरवठा योजना व साठवण तलाव कामे
येवला तालुक्यातील राजापूर व ४० गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना आणि धूळगावसह १७ गावे योजनेचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मान्यता आणि इतर अनुषंगिक बाबींची तत्पर पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच निफाड तालुक्यातील रेट्रोफिटिंगअंतर्गत सुधारित लासलगाव-विंचूरसह १६ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे काम येत्या महिनाभरात पूर्ण करावे. सावरगाव साठवण तलावाच्या कामाला तातडीने गती द्यावी, ज्यासाठी तीन गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून २३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी तातडीने सादर करावी. ममदापूर येथील साठवण तलाव, महालखेडा आणि देवना साठवण तलावांच्या कामांसह इतर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, ज्यामुळे नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यासोबतच पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल.
नदी संवर्धन आणि घनकचरा प्रकल्प
राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत लासलगाव येथील शिव नदी आणि विंचूर येथील लोणगंगा नदी संवर्धन प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करावेत. या दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी. दुष्काळी परिस्थितीत नद्यांचे संवर्धन आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव आणि विंचूर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांबाबत नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. तसेच येवला शहरातील अमृत २.० योजनेतील पाणीपुरवठा योजनेची कामे गतीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk










