नवी दिल्ली | ‘भारत रिन्यूएबल एनर्जी समिट–२०२६’ या परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा दालनाला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारत मंडपम येथे २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या परिषदेत महाराष्ट्र ‘फोकस स्टेट’ म्हणून सहभागी झाला आहे. येथे ऐतिहासिक गडकिल्ल्यांची ओळख आणि हरित ऊर्जेच्या दिशेने सुरू असलेली महाराष्ट्राची वाटचाल यांचा संगम साधणाऱ्या दालनात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम मांडण्यात आले आहेत. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री श्री. प्रल्हाद जोशी यांनी या परिषदेत नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने गुजरातनंतर देशात दुसरे स्थान मिळविल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी सादर केली जात आहे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा या चारही वीज कंपन्यांनी संयुक्तपणे हे दालन उभारले असून, यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विक्रम कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. आणि महाऊर्जाचे महासंचालक श्री. ओमप्रकाश बकोरिया यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
हरित ऊर्जा प्रकल्पांची आभासी सफर आणि आकर्षण
या ऊर्जा दालनातील ‘इमर्सिव्ह व्हर्च्युअल रिअॅलिटी झोन’ अभ्यागतांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या आभासी तंत्रज्ञानाद्वारे घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०, मागेल त्याला सौर कृषिपंप योजना आणि सिन्नर सौर ऊर्जा प्रकल्पाची सफर अनुभवता येत आहे. तसेच दृकश्राव्य सादरीकरणे आणि संवादात्मक डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून चारही वीज कंपन्यांची कामगिरी दाखवली जात असून सेल्फी बूथलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या सांस्कृतिक ओळखीवर आधारित रचना आणि माहितीच्या सुलभ मांडणीमुळे हे दालन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मान्यवरांकडून दालनाला भेट व कौतुक
राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. आणि महाऊर्जाचे महासंचालक श्री. ओमप्रकाश बकोरिया यांनी दालनाला भेट देऊन सादरीकरणाबाबत समाधान व्यक्त केले. या उत्कृष्ट संकल्पनेबद्दल श्री. लोकेश चंद्रा यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. याशिवाय राजस्थान ऊर्जा विकास आयटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. शिवप्रसाद नकाते, विविध राज्यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दालनाला भेट देऊन माहिती घेतली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक केले.
Source: Cosmo News Desk










