नवी दिल्ली | नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. ५) भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद व प्रदर्शन २०२६’च्या समारोप सत्रात हा पुरस्कार देण्यात आला. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांनी अभिनंदन केले आहे.
पुरस्कार आणि मूल्यांकन आराखडा
केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘नवीकरणीय ऊर्जा राज्य मूल्यांकन आराखड्या’अंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील राज्यांमध्ये महाराष्ट्राने गुजरातनंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही घोषणा केली. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या सहकार्याने हा मूल्यांकन आराखडा विकसित करण्यात आला होता. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेतील वाढ, धोरणात्मक व नियामक व्यवस्था, वीज ग्रिडची सज्जता, वीज वितरण कंपन्यांची कामगिरी आणि गुंतवणुकीसाठीचे वातावरण या निकषांवर हे मूल्यांकन करण्यात आले.
गडकिल्ल्यांच्या संकल्पनेतून हरित ऊर्जेचे प्रदर्शन
भारत मंडपम येथे २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या परिषदेत महाराष्ट्र ‘पार्टनर स्टेट’ म्हणून सहभागी झाला होता. ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संकल्पनेवर आधारित राज्याच्या ऊर्जा दालनाला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली हे दालन उभारले गेले. दालनातील ‘व्हर्च्युअल रिॲलिटी झोन’मध्ये घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प आणि सिन्नर सौर ऊर्जा प्रकल्पाची आभासी सफर अनुभवता आली. यादरम्यान मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० आणि ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेची माहितीही देण्यात आली.
Source: Cosmo News Desk











