बुलढाणा | जिल्ह्यातील संभाव्य पाणी आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी आतापासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका आढावा बैठकीत हे निर्देश दिले. या बैठकीस आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह कृषी, पशुसंवर्धन आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खरीप हंगामातील पावसाची तूट आणि पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम लक्षात घेऊन चारा व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्राच्या ‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारा लागवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चारा व्यवस्थापन आणि लागवड नियोजन
पशुसंवर्धन विभागाकडून चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या बियाण्यांची पेरणी झाली आहे किंवा नाही, याची माहिती कृषी सहाय्यक व तलाठ्यांमार्फत गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चारा लागवड झालेल्या क्षेत्राची तालुकानिहाय माहिती आठ दिवसांत सादर करावी. ग्रामस्तरावर चारा लागवड करून भविष्यातील टंचाई टाळावी. खरीप काढणीनंतर सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार आणि इतर पिकांचे अवशेष संकलित करून त्यांचा पशुखाद्य म्हणून वापर करावा. तसेच चारा संवर्धन, मुरघास निर्मिती, आणि पिकांच्या अवशेषांचे पोषणमूल्य वाढविण्याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करावे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारीसह चारा पिके लावावीत.
जलसंधारण आणि पाणीपुरवठा यंत्रणा
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुकास्तरावर जलसंधारणाची कामे गतीने करावीत. नद्या व नाले खोलीकरण, तलावांतील गाळ काढणे, पांदण रस्ते, शेततळे निर्मिती आणि माथा ते पायथा जलसंधारणाची कामे सूक्ष्म नियोजन करून राबवावीत. याद्वारे पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरवावे. जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती पाहता पाणी शुद्धीकरण प्लांट स्वच्छ व कार्यान्वित ठेवावेत. पाणी व वीजपुरवठ्यासाठी योग्य नियोजन करून इलेक्ट्रिशियनची उपलब्धता निश्चित करावी. नागरिकांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करावी आणि शासनाच्या उपाययोजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले.
Source: Cosmo News Desk











