मुंबई | महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवाची व्याप्ती आणि परंपरा जगासमोर मांडण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या डिजिटल व्यासपीठावर उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईतील बँडस्टँड येथे ‘बाप्पाचा कट्टा’ या ९० दिवसांच्या सांस्कृतिक उपक्रमाचा शुभारंभ केला.
गणेशोत्सवाचे जागतिक स्तरावर जतन आणि आठवणींचे संकलन
या कार्यक्रमात अभिनेते अमेय वाघ, चित्रपट निर्माते निपुण धर्माधिकारी आणि ‘बाप्पा डॉट ओआरजी’चे संस्थापक श्रीपाद अष्टेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरे करण्यास सुरुवात झाली असून हा उत्सव आता देशासह परदेशातही पोहोचत आहे. गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी, कथा, छायाचित्रे आणि परंपरांची माहिती नागरिकांनी ‘बाप्पा डॉट ओआरजी’वर नोंदवावी, असे आवाहन मंत्र्यांनी केले. या उपक्रमात सहभाग घेणाऱ्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल ‘कल्चरल प्रिझर्व्हर सर्टिफिकेट’ दिले जात आहे.
विविध स्पर्धा आणि मान्यवरांचे मनोगत
‘बाप्पाचा कट्टा’च्या माध्यमातून उखाणे, म्हणी, ओव्या, पारंपरिक खेळ आणि विविध कलांच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. निपुण धर्माधिकारी यांनी संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा संगम साधणारे हे व्यासपीठ नव्या पिढीसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. अमेय वाघ यांनी लोकमान्य टिळकांनी रुजवलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जगभर पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले. श्रीपाद अष्टेकर यांनी नागरिकांना व्हॉट्सॲपवर ‘बाप्पा’ असा संदेश पाठवून आपल्या कथा व आठवणी नोंदवण्याचे आवाहन केले.
Source: Cosmo News Desk








