Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maharashtra

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेत ६ कोटी १८ लाख रुपयांचा धनादेश दिल्याबद्दल आभार व्यक्त करताना, बळीराजाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र सेवा महोत्सव समितीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जबिंदा मैदान, बीड बायपास येथे ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शेतकऱ्यांना नवी प्रेरणा आणि बळ मिळत असल्याचे सांगितले. छत्रपतींच्या विचारांवर शासन काम करीत असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, चारा उपलब्धतेचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांसमोरील अडचणी लक्षात घेऊन शहरातील उद्योजकांनी सामाजिक बांधिलकीतून मदतनिधी संकलित केला होता.

उद्योजकांकडून ६ कोटी १८ लाख रुपयांची मदत

संकलित झालेला ६ कोटी १८ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्योजकांनी दाखविलेली एकजूट महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले. या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नारायण कुचे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर आणि महंतांची विशेष उपस्थिती होती.

महानाट्याचे आयोजन आणि विविध उपक्रम

या महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती महेंद्र वसंतराव राजेमहाडिक यांनी केली असून, जवळपास १५ हजारावर प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध संस्थांच्या महंतांचे पाद्यपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच देवेंद्र समितीच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक हजार पाण्याच्या टाक्या व महिला सक्षमीकरणाकरिता ५०० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

Source: Cosmo News Desk

Related Posts