नांदेड | ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर शासनाचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत, आरोग्य यंत्रणेने गावातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवाव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. ‘आरोग्य संवाद यात्रा २०२६’ अंतर्गत त्यांनी हिमायतनगर तालुक्यातील विविध भागांना भेट दिली.
आरोग्य संस्थांची पाहणी व संवाद
आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी ‘आरोग्य संवाद यात्रा २०२६’ अंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील दरेगाव, वाळकेवाडी, दुधड, सरसम आणि हिमायतनगर येथील आरोग्य संस्थांना भेटी दिल्या. यावेळी दरेगाव तांडा येथे त्यांनी शेती पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. आरोग्य सेविका व सेवकांनी घरोघरी जाऊन तपासणी, औषधोपचार आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच वाळकेवाडी येथे दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान दिवंगत राजू ढाले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि दरेगाव तांडा व वाळकेवाडी येथे दिवाळीनिमित्त शिधा वाटप केले.
उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य केंद्रांना भेट
दुधड येथील आरोग्य उपकेंद्र आणि सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन त्यांनी उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. सरसम येथे ईसीजी तपासणी सुविधेबाबत माहिती घेतली. हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी विविध विभागांची पाहणी केली आणि उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार, औषधे व दर्जेदार सुविधा देण्याचे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात खासदार नागेश पाटील-आष्टीकर, आमदार बाबुराव कदम-कोहळीकर, आयुक्त संजय काटकर यांच्यासह अनेक अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk











