मुंबई | राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘वंदे मातरम’ ब्रेल संस्कार भारती दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकभवन येथे पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन, नाशिक या संस्थेने लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रन संस्थेच्या सहकार्याने केले होते.
ब्रेल अंकाचे प्रकाशन आणि मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमात ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. या ब्रेल दिवाळी विशेषांकामध्ये कला, क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि आरोग्य आदी विषयांवर आधारित लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. हा दिवाळी अंक राज्यातील सर्व अंध विद्यार्थ्यांच्या शाळा आणि कार्यशाळांना मोफत दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमासाठी कॅप्टन पर्सी मास्टर (मास्टर मरीन सर्व्हिसेस लिमिटेड) आणि पियुष जसरानी (हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्ट) यांनी आर्थिक साहाय्य केले आहे. कार्यक्रमाला लायन्स इंटनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पवन अगरवाल, लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रनचे अध्यक्ष जितेंद्र सकपाळ, प्रकल्प समन्वयक लायन विजय रायमाने, अपार इंडस्ट्रीजचे संचालक नुपूर देसाई आणि कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थिनींचे सादरीकरण आणि राज्यपालांची घोषणा
कार्यक्रमादरम्यान कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड, दादर येथील विद्यार्थिनींनी सरस्वती वंदना सादर केली, ज्याच्या सुरेल सादरीकरणाबद्दल राज्यपालांनी त्यांचे कौतुक केले. तसेच, महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या डिझायनर निशा सासमल यांनी ‘वंदे मातरम’ गीताला १५१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना १५१ दिवे भेट दिले. राज्यपालांनी संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या ब्रेल पुस्तक प्रकाशन योजना, शिष्यवृत्ती योजना आणि स्वयंरोजगारासाठी मदत या कार्याचे कौतुक केले. या प्रसंगी संस्थेतर्फे पुरस्कृत करण्यात आलेल्या दहा दृष्टिहीन व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही राज्यपालांनी केली.
Source: Cosmo News Desk








