Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • अमरावती नदी पुन्हा प्रवाही होईपर्यंत प्रयत्न थांबणार नाहीत: पालकमंत्री जयकुमार रावल
Maharashtra

अमरावती नदी पुन्हा प्रवाही होईपर्यंत प्रयत्न थांबणार नाहीत: पालकमंत्री जयकुमार रावल

दोंडाईचा येथील अमरावती नदीच्या पाहणी दौऱ्यात उपस्थित अधिकारी आणि पालकमंत्री

धुळे | दोंडाईचा शहराची जीवनवाहिनी असलेल्या अमरावती नदीला पुन्हा प्रवाही करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग, तज्ज्ञ संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून व्यापक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. अमरावती नदीत पुन्हा पाणी उपलब्ध होईपर्यंत आपले प्रयत्न थांबणार नाहीत, असा ठाम निर्धार राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा येथे व्यक्त केला. नदी आटण्याची कारणे शोधून भूजल पुनर्भरण, जलसंवर्धन आणि लोकसहभागातून पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करण्यावर विशेष भर दिला जात आहे. या कामासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मागणी केल्यानंतर, राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) आणि राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाच्या (NRCD) संयुक्त पथकाने दोंडाईचा येथे भेट देऊन नदीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

शास्त्रीय उपाययोजना आणि पाण्याचा ताळेबंद

नदी पुन्हा प्रवाही करण्यासाठी केवळ बंधारे बांधून पाणी अडविणे पुरेसे नसून ते जमिनीत मुरविणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री रावल यांनी स्पष्ट केले. परिसरातील पाऊस, उपलब्ध पाणी, वाहून जाणारे पाणी आणि जमिनीत मुरणारे पाणी यांचा अचूक हिशेब मांडून पाण्याचा ताळेबंद तयार करणे गरजेचे आहे. यंदा कमी पावसामुळे भेडा नदीसह परिसरातील अनेक नदी-नाले कोरडे पडले आहेत. वाळू उपसा, गाळ साचणे आणि अतिक्रमणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुख्य पात्रासह उपनद्या आणि लहान नाले मोकळे करावे लागणार आहेत. यापूर्वी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून १५ ते २० कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला असून, केंद्रीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आता अधिक व्यापक नियोजन केले जात आहे. तसेच ऑक्सिजन पार्क, फ्रूट पार्क आणि दोंडाईचा शहराला ‘बोट नगरी’ म्हणून विकसित करण्याची संकल्पनाही मांडण्यात आली आहे.

लोकसहभागाची चळवळ आणि आगामी नियोजन

नदी पुनरुज्जीवनाचे काम केवळ शासकीय यंत्रणांवर सोपविता येणार नाही, तर महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लातूरमधील मांजरा नदी आणि शहादा परिसरातील जलसंवर्धानाच्या अनुभवांचा वापर करून स्थानिक परिस्थितीनुसार उपाययोजना सुचविल्या जात आहेत. ईशा फाउंडेशनसारख्या संस्थांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. दरम्यान, उद्या हे केंद्रीय पथक संपूर्ण अमरावती नदीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. केंद्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रशासकीय नियोजन आणि नागरिकांच्या सहभागातून अमरावती नदीचे पुनरुज्जीवन देश पातळीवर आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts