Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • राज्यात नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी रतन टाटा विद्यापीठाचा करार
Maharashtra

राज्यात नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी रतन टाटा विद्यापीठाचा करार

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झालेला करार

मुंबई | राज्यभरातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत एक महत्त्वाचा करार संपन्न झाला आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेली गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल (जीटीयूआयसी) यांच्यात हा सामंजस्य करार झाला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या उपक्रमांतर्गत ग्रामीण व निमशहरी भागांतील गुणवान तरुणांना उद्योगजगताशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील महाविद्याلاهये, विद्यापीठे, आयटीआय आणि पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेची माहिती दिली जाणार आहे. निवडक नवोन्मेषकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तांत्रिक साहाय्य आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल, ज्यामुळे युवकांना सक्षम उद्योजक म्हणून घडविण्यास मदत होईल.

ग्रामीण उद्योजकतेला चालना देणार

गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिलचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील युवक आणि महिलांना रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनविणे हा यामागचा उद्देश आहे. योग्य मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे व्यवसायवाढीला येणाऱ्या मर्यादा दूर करण्यासाठी संस्था ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने काम करीत आहे. या स्पर्धेसाठी संस्थेद्वारे जास्तीत जास्त सहकार्य केले जाईल.

या करारावर कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर आणि जीटीयूआयसीचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, शिवाजी मानकर, शिखर जैन, रामेश्वर पवार, सुरेश घोरपडे, अण्णासाहेब पाटील, दिवाकर केसकर, ॲड. रिचा पाठक, अक्षता भांबळे, विशाल बंडगर आणि जितू चव्हाण उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts