मुंबई | मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक तसेच कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘आपलं मंत्रालय’ ही गृहपत्रिका प्रकाशित करण्यात येते. दीपावलीच्या निमित्ताने मंत्रालयातील परिषद सभागृहात ‘आपलं मंत्रालय’च्या वतीने एका विशेष काव्यसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी मनोगत व्यक्त केले.
साहित्यिक कलागुणांना प्रोत्साहन
प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी स्पष्ट केले की, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमधील कवी आणि साहित्यप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. ‘आपलं मंत्रालय’ हे केवळ एक मासिक नसून ते प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे स्वतःचे हक्काचे व्यासपीठ आहे. सर्वांनी या मासिकाशी आपलेपणाने जोडून घेत आपल्या सक्रिय सहभागाने ते अधिक समृद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान नामदेव कोळी यांच्या ‘वाघूर’ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक (माहिती) (प्रशासन) डॉ. किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी कीर्ती पांडे उपस्थित होते.
वाचनामुळे व्यक्ती प्रगल्भ होते
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सांगितले की, वाचनामुळे व्यक्ती प्रगल्भ होते आणि विचार करण्याची नवी दृष्टी मिळते. सामान्य व्यक्तीला असामान्य बनविण्याची ताकद वाचनामध्ये असते, त्यामुळे सर्वांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे. शासनाकडून कला, साहित्य आणि संगीत क्षेत्राच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जात असून कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या काव्यसंध्या कार्यक्रमात सतीश मोघे, डॉ. नामदेव भोसले, मीनाक्षी पाटील, लीना संखे, अंजली ढमाळ, अजय भोसले, नामदेव कोळी, डॉ. जगदीश मोरे, शशी डंभारे आणि प्रवीण कुलकर्णी यांनी आपल्या विविध विषयांवरील कविता सादर केल्या. या कवितांमधून सामाजिक, सांस्कृतिक, मानवी नातेसंबंध आणि जीवनातील विविध भावभावनांचे प्रतिबिंब उमटले, ज्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Source: Cosmo News Desk








