Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • नागरिकांचे प्रश्न सुटल्यास महसूल सुधारणा यशस्वी: विकास खारगे
Maharashtra

नागरिकांचे प्रश्न सुटल्यास महसूल सुधारणा यशस्वी: विकास खारगे

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित जिल्हाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे दृश्य

मुंबई | महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रशासकीय सुधारणा आणि नागरिकाभिमुख योजनांची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित जिल्हाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत ही भूमिका मांडली. मंत्रिमंडळाचे निर्णय, नवीन पोर्टल किंवा कायद्यातील बदल ही सुधारणांची सुरुवात असून, यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आणि त्यांचे प्रश्न सुटले तरच महसूल सुधारणांना खऱ्या अर्थाने यश मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या धोरणात्मक निर्णयांना अपेक्षित परिणाम मिळवून देण्याची महत्त्वाची जबाबदारी जिल्हास्तरीय यंत्रणांवर असल्याचे त्यांनी नमूद केले. या परिषदेस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी राधा कुलकर्णी यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाचे कायदे आणि योजना

नागरिकांना मालमत्तेची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ‘लँड टायटलिंग’ विधेयक लवकरच अधिवेशनात मांडले जाणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात एकाच कार्यालयात दस्त नोंदणी, फेरफार व मालकी हक्क नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरी भागातील प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र मालमत्ता पत्रक देण्यासाठी ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ योजना राबविण्याचे नियोजन आहे. इमारतीच्या मुख्य मालमत्ता पत्रकासोबत प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ नमूद असलेले स्वतंत्र पूरक पत्रक दिले जाईल. जमिनीची आधी मोजणी, त्यानंतर दस्त नोंदणी आणि नंतर फेरफार अशी कार्यपद्धती स्वीकारली जाणार असून, मोजणीचा कालावधी १४ ते २८ दिवसांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ‘महाखनिज’ प्रणालीद्वारे उत्खननापासून खनिज वाहतुकीपर्यंत देखरेख ठेवण्यात येणार असून सर्व खाणी व वाळूघाटांचे ड्रोन सर्वेक्षण केले जाईल. ‘महाभूमी स्टॅक’वर जमिनीचे स्थान, मालकी, व्यवहार, बँक बोजा, दावे-हरकती, नकाशे व न्यायालयीन प्रकरणांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तसेच नोंदणी व मुद्रांक विभागाची ६० आदर्श कार्यालये पासपोर्ट सेवा केंद्रांच्या धर्तीवर विकसित केली जाणार आहेत.

प्रशासकीय भूमिका आणि समन्वय

रेडीरेकनरचे दर अधिक वास्तववादी करण्यासाठी समान स्वरूपाच्या मालमत्तांचे लहान भौगोलिक गट तयार करून ‘मायक्रो झोनिंग’ केले जाणार आहे. ‘एक जिल्हा-एक नोंदणी’ सुविधेनंतर भविष्यात ‘एक राज्य-एक नोंदणी’ व्यवस्था निर्माण करण्याचे विभागाचे नियोजन आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ निवेदने किंवा सूचनांवर प्रतिक्रिया देण्यापुरते मर्यादित न राहता परिवर्तनशील दृष्टिकोनातून काम केले पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. इतर शासकीय विभाग, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, अभ्यासक, कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांशी समन्वय साधून विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन विकास खारगे यांनी यावेळी केले.

Source: Cosmo News Desk

Related Posts