नाशिक | नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला धार्मिक अधिष्ठान मिळवून वातावरण भक्तिमय करण्यासाठी गोदाकाठी तीन दिवसीय सिंहस्थ महाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. ३०) सकाळी ८.१५ वाजता ध्वजदंड प्रतिष्ठापना आणि नगरप्रदक्षिणेने या सोहळ्याचा प्रारंभ होणार असून दुपारी १ वाजता भव्य धर्मध्वज शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाने केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी (दि. ३१) दुपारी १२.०२ वाजता सिंहस्थ महाध्वजारोहण होणार आहे.
धार्मिक विधी आणि महाध्वजारोहण
गोदावरी तीरावर शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत प्रायश्चित्त संकल्प, तीर्थपूजन, पंचार्घ्य प्रदान, प्रधान संकल्प, गणेशपूजन, पंचांग विधान, ब्राह्मण वरण, प्रधानदेवता स्थापना आणि नवग्रह रुद्र स्थापना हे विधी पार पडणार आहेत. दुपारी २.३० ते सायंकाळी ७.३० या कालावधीत स्नपन विधान, नवग्रह हवन, प्रतिष्ठापना हवन, धान्याधिवास, शय्याधिवास, सायंपूजन आणि श्री गोदावरी प्रार्थना होणार आहे. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत स्थापित देवतांचे पूजन होईल. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत राष्ट्रपती आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संकल्प, गणेशपूजन, पंचार्घ्य समर्पण आणि तीर्थपूजनाचे विधी झाल्यानंतर दुपारी १२.०२ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ महाध्वजारोहण होईल.
त्रिदिवसीय सोहळ्याची सांगता आणि सुरक्षा व्यवस्था
रविवारी (दि. १) रामकुंडावर सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत प्रातर्पूजन, उत्तरांग हवन, बलिदान, पूर्णाहुती, अवभृत स्नान, गोदाआरती, प्रार्थना आणि कर्म समर्पण हे धार्मिक विधी झाल्यानंतर तीन दिवसीय प्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता होईल. राष्ट्रपतींच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक भेटीमुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्र्यंबकनगरीला गुरुवारी सकाळपासून पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुख्य मार्गासह सर्वत्र पोलिसांचा खडा पहारा असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. राष्ट्रपती आणि मान्यवर नेत्यांच्या दौर्यामुळे प्रमुख मार्गावरील दुकाने दोन दिवस बंद राहणार आहेत.
Source: Cosmo News Desk









