Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Kumbh Mela
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ
Kumbh Mela

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ

नाशिक | नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महापर्वाचा औपचारिक प्रारंभ आज (दि. ३१) रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहनाने झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी अभिजित मुहूर्तावर धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली, यावेळी गोदावरी पूजन आणि यज्ञविधी देखील पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ओझर विमानतळावर पोहोचल्यानंतर रामतीर्थ परिसरात सिंहस्थ धर्मध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहिल्या. राष्ट्रपतींचे ओझर विमानतळ येथे आगमन झाल्यावर राज्यपाल डॉ. जिष्णु देव वर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. या ऐतिहासिक प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार रावल, नरहरी झिरवाळ, डॉ. अशोक ऊईके, दादाजी भुसे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार सुहास कांदे, उपमहापौर विलास शिंदे, जलसंपदा सचिव एकनाथ डवले, अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेशकुमार, शिशिरकुमार पात्रा, लेफ्टनंट जनरल एन. एस. सराना, एअर कमाडोर विक्रम सिंग आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

राष्ट्रपतींचा दौरा आणि धार्मिक विधी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रामकुंडावर आगमन झाल्यानंतर गौतमी गोदावरी मंदिर परिसरात यज्ञपूजा केली आणि यज्ञात समिधा अर्पण केल्या. सुमारे १० मिनिटांच्या या विधीसाठी पुरोहित संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि सुहास शुक्ल यजमान म्हणून उपस्थित राहिले. गंगापूजनानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ ध्वजारोहण झाले, हा सोहळा सुमारे पाच मिनिटांचा होता. ध्वजारोहण सोहळ्यानंतर पुढील वर्षभर चालणाऱ्या कुंभपर्वास औपचारिकरित्या प्रारंभ झाला असून, त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते गोदावरीची महाआरती केली जाणार आहे. राष्ट्रपतींचा नियोजित दौरा पाहता त्या दुपारी १२.३० वाजता एमपीए अतिथिगृहात परतल्या. त्यानंतर दुपारी २ वाजता त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर गोदापूजन, आणि दुपारी २.३० वाजता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन व धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी ५.३० वाजता सार्वजनिक कार्यक्रम आणि गोदावरी महाआरतीच्या सोहळ्यात राष्ट्रपती सहभागी होणार आहेत.

आखाड्यांचे संत-महंत आणि सुरक्षा व्यवस्था

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औपचारिक प्रारंभानिमित्त शनिवारी (दि.३१) सायंकाळी गोदावरीच्या तीरावर होणाऱ्या महाआरती सोहळ्यात देशातील प्रमुख धर्माचार्य, जगद्गुरू आणि तेरा आखाड्यांचे साधू-महंत एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. सुमारे दोनशे वर्षांनंतर शैव-वैष्णव परंपरेतील संत-महंत एकत्र येत असल्याचा दावा केला जात आहे. या सोहळ्यासाठी शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विदुशेखर भारती यांच्यासह चार जगद्गुरू आणि सर्व तेरा आखाड्यांचे प्रतिनिधी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. धर्मध्वज सोहळा आणि राष्ट्रपतींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, तब्बल पाच हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी सज्ज आहे. यामध्ये नाशिक शहर पोलिस दलातील तीन हजार, तर बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या दोन हजार पोलिसांचा समावेश असून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र ७०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts