Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • नांदेडमध्ये रेशीम शेती प्रशिक्षणास सुरुवात, उत्पन्नात वाढ होणार
Maharashtra

नांदेडमध्ये रेशीम शेती प्रशिक्षणास सुरुवात, उत्पन्नात वाढ होणार

नांदेड येथील रेशीम शेती प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व शेतकरी

नांदेड | कमी पाणी आणि खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात रेशीम शेती प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयांतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय, नांदेड यांच्यावतीने सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत सात दिवसीय लाभार्थी सक्षमीकरण निवासी प्रशिक्षणाचे आयोजन एसबीआय आरएसईटीआय, नांदेड येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन आरईसी परभणीचे वैज्ञानिक डॉ. अशोक जाधव यांच्या हस्ते झाले.

यावेळी कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे विभागप्रमुख डॉ. देविकांत देशमुख आणि जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात रेशीम शेतीचा विस्तार होत असून कमी पाणी, कमी खर्च आणि कमी कालावधीत उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी या शेतीकडे वळत आहेत. हे प्रशिक्षण शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन रेशीम उत्पादन वाढविण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. जाधव यांनी व्यक्त केला.

प्रशिक्षणाचे स्वरूप आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन

दि. २० ते २६ नोव्हेंबर या कालावधीत होत असलेल्या या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षणात तुती लागवड व बाग व्यवस्थापन, रेशीम कीटक संगोपन, रोग व्यवस्थापन, कोष उत्पादन, बाजारपेठ व्यवस्था आणि शासकीय योजनांची माहिती तज्ज्ञांकडून दिली जात आहे. प्रात्यक्षिकांद्वारे दिले जाणारे हे प्रशिक्षण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीत उपयोगी ठरेल. प्रशिक्षणानंतरही लाभार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

रेशीम शेतीमध्ये तुतीच्या पानांवर रेशीम कीटकांचे संगोपन करून रेशीम कोषांचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने तुती रेशीम उत्पादन केले जाते. एकदा लागवड केलेली तुती बाग १५ ते २० वर्षे उत्पादन देऊ शकते. वर्षातून पाच ते सहा वेळा कीटक संगोपन करता येत असल्याने उत्पन्नाचे नियमित साधन उपलब्ध होते. तुती लागवड, कीटक संगोपन गृह, साहित्य व उपकरणांसाठी शासनाकडून अनुदान तसेच प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते. २६ नोव्हेंबर रोजी रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचा समारोप आणि प्रमाणपत्रांचे वितरण होणार आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts