नांदेड | राज्यातील शेतकऱ्यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत खचून न जाता कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन राज्याचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले आहे. नांदेड तालुक्यातील सायाळ येथे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी करताना ते बोलत होते. यावेळी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईबाबत उपाययोजना
पुढील दहा महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, टँकर, आनंदाचा शिधा यांसह आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असून, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून समन्वयाने काम केले जाईल, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके-बोंढारकर, आमदार बाबूराव कदम-कोहळीकर यांच्यासह विविध अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
विधवा महिलेच्या घरी भेट आणि आरोग्य सुविधांची पाहणी
कार्यक्रमादरम्यान उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांसोबत दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. सायाळ येथील पाच मुलींसह राहणाऱ्या विधवा महिला मुक्ताबाई केशव धुमाळे यांच्या घरी भेट देऊन त्यांनी कुटुंबीयांसोबत फराळ केला आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही दिली. यानंतर परतीच्या प्रवासात त्यांनी वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन तेथील आरोग्यविषयक सोयी-सुविधांची पाहणी केली.
Source: Cosmo News Desk







