नांदेड | राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी नांदेड आणि मुदखेड तालुक्यातील मयत शेतकरी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली. बोरगाव तेलंग येथील मयत शेतकरी शंकर क्षीरसागर आणि माळ कौठा येथील मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या घरी त्यांनी आज भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही कुटुंबांचे सांत्वन करून शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
बोरगाव तेलंग येथील भेट आणि उपचारार्थ निर्देश
नांदेड तालुक्यातील बोरगाव तेलंग येथे राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी मयत शेतकरी शंकर क्षीरसागर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या शोकाकुल कुटुंबातील पत्नी, आई, वडील आणि मुली यांच्याशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. तसेच, मयत शेतकऱ्यांच्या वडिलांवर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्याबाबत त्यांनी संबंधित आरोग्य विभागाला तात्काळ निर्देश दिले. शासनाच्या विविध योजनांमधून पात्रतेनुसार सर्व लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी हमी त्यांनी दिली. या प्रसंगी तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
माळ कौठा येथे शिंदे कुटुंबीयांची विचारपूस
मुदखेड तालुक्यातील माळ कौठा येथे मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या घरी जाऊन राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. चंद्रकांत शिंदे यांच्या आई, पत्नी आणि मुलांची आस्थेवाईकपणे चौकशी करत त्यांनी या दुःखद प्रसंगी कुटुंबियांना आधार दिला. शासनाच्या माध्यमातून आवश्यक मदत आणि शासकीय योजनांचे लाभ कायदेशीर पात्रतेनुसार मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. माळ कौठा येथील या भेटीदरम्यान आमदार श्रीजया चव्हाण यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk







