नवी दिल्ली | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय यश, नेमबाजीतील प्रशिक्षण आणि दिव्यांग सैनिकांच्या क्रीडा पुनर्वसनातील योगदानामुळे महाराष्ट्राने या पुरस्कारांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील खेळाडू आणि प्रशिक्षक सन्मानित
नाशिकचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विदित संतोष गुजराती आणि नागपूरची युवा बुद्धिबळपटू दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विदितने 45 व्या फिडे बुद्धिबळ ऑलिंपियाड 2024 मध्ये सुवर्णपदक, हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक आणि फिडे ग्रँड स्विस 2023 स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. दिव्याने 45व्या फिडे बुद्धिबळ ऑलिंपियाड 2024 मध्ये दोन सुवर्णपदके आणि आशियाई खंडीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच, नेमबाजी क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशिक्षण कार्यासाठी महाराष्ट्राच्या प्रशिक्षक नेहा नंदकुमार चौहान यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोडचा गौरव
दिव्यांग सैनिकांच्या क्रीडा पुनर्वसनातील योगदानासाठी पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड या संस्थेला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 ने गौरविण्यात आले. 2017 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने सैनिकांना पॅरा क्रीडा प्रकारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले आहे. संस्थेच्या 150 हून अधिक खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिक 2024 आणि हांगझाऊ आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांसह विविध स्पर्धांमध्ये 300हून अधिक पदके मिळवली आहेत. संस्थेच्या वतीने लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यास केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री मनसुख मांडविया उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk











