नाशिक | क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहप्रकल्प अधिकारी प्रवीण दामाडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाणी पुरवठा व सौर ऊर्जा योजना
पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, या सप्ताहानमित्त जिल्ह्यातील आदिवासी पाडे आणि वस्त्यांवरील उर्वरित पाणीपुरवठा योजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून साडेबारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील अतिदुर्गम भागातील सुमारे ७० आदिवासी गावे व पाड्यांमध्ये सौर ऊर्जेने वीजपुरवठा करण्यासाठीही जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवाव्यात. विशेषतः आदिवासी भागात सिकलसेल अॅनिमियाची तपासणी व जनजागृतीवर भर द्यावा तसेच शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे.
विविध उपक्रम व प्रशासकीय प्रयत्न
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेद्वारे आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत केंद्र सरकारकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, शासकीय वसतिगृहे व आश्रमशाळांमध्ये अभ्यासिका, सीसीटीव्ही, इन्व्हर्टर, सौर ऊर्जा विद्युतीकरण, डिजिटल बोर्ड आणि नवीन इमारतींची कामे सुरू असल्याची माहिती दिली. या सप्ताहात ११ व १२ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद, १३ नोव्हेंबर रोजी लाभवाटप व महिला बचतगट मार्गदर्शन, १४ नोव्हेंबर रोजी स्मारकांची स्वच्छता व दीपोत्सव, १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती आणि सन्मान सोहळा, १६ नोव्हेंबर रोजी आधारकार्ड व कागदपत्रे शिबिरे, १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी, तर १८ नोव्हेंबर रोजी रोजगार व कौशल्यविकास मार्गदर्शन उपक्रम आयोजित केले आहेत.
Source: Cosmo News Desk











