नाशिक | मुंबईतील चेंबूर पोलीस ठाणे हद्दीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या एका संशयिताला नाशिक शहर गुन्हे शाखा अंबड युनिट-३ च्या पथकाने धडक कारवाई करत नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी अपहृत मुलीची सुरक्षित सुटका केली असून तिला कायदेशीर प्रक्रियेसाठी पुढील कारवाईस्तव संबंधित पोलीस ठाण्याच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात रचला सापळा
चेंबूर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ३१) अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील अपहृत मुलगी नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. १२) पोलिसांच्या पथकाने संबंधित परिसरात सापळा रचला.
सापळा रचल्यानंतर पोलीस अंमलदार गौरव धात्रक यांनी अपहृत मुलीला ओळखले. त्यानंतर महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने मुलीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीमध्ये आरोपी हा मुलीला आमिष दाखवून पालकांच्या कायदेशीर ताव्यातून पळवून नेत असल्याचे उघडकीस आले. आरोपीने या मुलीला विविध ठिकाणी नेल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
संशयित आरोपी ताब्यात आणि पोलिसांची कामगिरी
प्रशांत ठाकरे उर्फ रवि गायकवाड (वय ३४, रा. पोस्टल कॉलनी, चेंबूर, मुंबई) असे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर अपहृत मुलीसह त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चेंबूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, राजेश महाले, महेंद्र दोंदे, गौरव धात्रक, चारुदत्त निकम, हर्षल जाधव, अरुण चव्हाण आणि अंमलदार सविता कदम यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.
Source: Cosmo News Desk







