पुणे | क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आदिवासी रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, खेड पंचायत समितीच्या सभापती गौरीताई मुऱ्हे, उपसभापती दिलीप डुबे, ॲड. किरण गभाले, जनजाती सल्लागार समितीचे सदस्य आणि प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा यांनी अल्प वयातच ब्रिटिश सत्ता, सावकारी आणि जमीनदारी व्यवस्थेला आव्हान देत ऐतिहासिक उलगुलान घडवला. त्यांच्या संघर्षाचा व त्यागाचा वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
आदिवासी संस्कृती आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि जडणघडणीत आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान मोलाचे आहे. खानदेश व सातपुड्यातील भिल्ल बांधवांनी दिलेला लढा, राघोजी भांगरे व रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली महादेव कोळी समाजाने केलेला उठाव आणि वीर बाबुराव शेडमाके यांची कामगिरी हा गौरवशाली इतिहास आहे. जनजातीय गौरव दिनानिमित्त संपूर्ण आठवडाभर आयोजित कार्यक्रमांमुळे आदिवासी समाजाची लोकनृत्ये, लोकसंगीत, हस्तकला आणि वेशभूषा देशासमोर येत आहे. निसर्गाशी जोडलेली जीवनपद्धती जगणाऱ्या आदिवासी समाजाकडूनच पर्यावरणप्रेमाची ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पारंपरिक रानभाज्या व खाद्यपदार्थांना आयुर्वेदात विशेष महत्त्व असून, या महोत्सवामुळे खाद्यसंस्कृतीचे जतन होण्यासह स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध होईल.
शासन विकास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या सर्वसमावेशक विचारानुसार आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या शिकवणीनुसार राज्यातील शेवटच्या आदिवासी पाड्यापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. घोडेगाव प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वितरण, आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि पारधी मेळाव्यासारखे उपक्रम कौतुकास्पद आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रकल्प अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
Source: Cosmo News Desk











