पुणे | राज्यातील पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मुळशी तालुक्यातील कासारसाई-दारुंब्रे येथील संत तुकाराम साखर कारखान्याच्या परिसरातील ऊसतोड कामगारांच्या पालावर प्रत्यक्ष भेट देऊन भाऊबीज साजरी केली. ऊन-पावसाची पर्वा न करता कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करणाऱ्या कामगारांशी आपुलकीचे नाते जपत त्यांनी या कामगारांची विचारपूस केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी पालावर चुलीवर स्वयंपाक करून कामगारांसोबत स्नेहभोजन केले. मंत्र्यांच्या या आगळ्यावेगळ्या भेटीमुळे तेथील कामगारांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. दुष्काळी परिस्थितीमुळे गाव सोडलेल्या कामगारांसाठी हा सण अत्यंत आनंददायी ठरला.
भाऊबीज आणि महिलांना भेटवस्तूंचे वाटप
भाऊबीजेच्या या पवित्र सणानिमित्त श्रीमती मुंडे यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरुपात महिलांना साड्या भेट देण्यात आल्या. तसेच कामगारांच्या वतीने देखील श्रीमती मुंडे यांना साडीचोळीची ओवाळणी भेट म्हणून देण्यात आली. यावेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, शेतकी अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते. आमदार सुनील शेळके यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या पाठीमागे पंकजा ताई नेहमी खंबीरपणे उभ्या राहत असतात आणि त्यांच्या पालावर येऊन कामगारांसोबत खरी दिवाळी साजरी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी महामंडळाची स्थापना
या प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, त्या दरवर्षी कष्टकरी कामगारांसोबत दिवाळी साजरी करत असतात. काही दिवसांपूर्वी घडलेल्या २२ वर्षाच्या ऊसतोड कामगाराच्या मृत्यूच्या घटनेने मन सुन्न झाल्याचे त्यांनी नमूद केले. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षण आणि आरोग्यासाठी मदत मिळावी तसेच त्यांचे प्रश्न सोडवले जावेत, यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कामगारांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असल्याचे सांगत त्यांनी कामगारांना आपल्या अडीअडचणींबाबत मोकळ्या मनाने व्यक्त होण्याचे आवाहन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान, माणेवाडी (जि. अहिल्यानगर) येथील कुंडलिक बडे आणि आष्टी (जि. बीड) येथील नवनाथ भोसले या कामगारांनीही पंकजा मुंडे यांच्या भेटीमुळे झालेल्या आनंदाबद्दल आणि स्वागताच्या तयारीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
Source: Cosmo News Desk











