ठाणे | दीपावलीच्या सणानिमित्त ठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघातील घोडबंदर रोड येथील पानखंडा येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून स्थानिक आदिवासी शेतकरी आणि शेतमजुरांसोबत दिवाळी साजरी केली. संकटांचा आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या आदिवासी व शेतकरी बांधवांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी दिसून आले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली, तर स्थानिक आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत व लोकनृत्याच्या तालावर मान्यवरांचे स्वागत केले.
आदिवासी बांधवांच्या घरी जाऊन साधला संवाद
मंत्री प्रताप सरनाईक यांनी केवळ औपचारिकता न पाळता आपल्या परिवारासह आदिवासी बांधवांच्या घरी भेट दिली. त्यांनी जमिनीवर बसून त्यांच्यासोबत दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला. तसेच त्यांच्या अडचणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीशी संबंधित समस्या अत्यंत आत्मीयतेने जाणून घेतल्या. कोणत्याही परिस्थितीत बळीराजा आणि आदिवासी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी दिला. दुष्काळ, अनियमित पाऊस आणि विविध अडचणींमुळे हतबल झालेल्या शेतकरी व आदिवासी बांधवांच्या मनात आशेचा किरण निर्माण करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.
संवेदनशील प्रशासनाचा पुनरुच्चार
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आव्हानानुसार, राज्यभरातील दुष्काळ व बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केवळ कार्यालयात न बसता खेडोपाडी जाऊन शेतकरी व आदिवासी बांधवांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. याच भूमिकेचा पुनरुच्चार करत मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, स्वतःच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासोबतच अशा घटकांच्या दारात जाऊन फराळाचा आनंद घेतल्याने त्यांना मोठा मानसिक आधार मिळतो. शासनाची मदत पोहोचवण्यासोबतच संकटकाळात शासन आणि लोकप्रतिनिधी पाठीशी असल्याचा विश्वास निर्माण करणे हे शासनाचे मुख्य धोरण आहे. प्रशासनाची ही आपुलकीची भेट नागरिकांना भावनिक व सामाजिक आधार देणारी ठरली असून, यामुळे शासनाचा संवेदनशील मानवी चेहरा समोर आला आहे.
Source: Cosmo News Desk










