मुंबई | परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ठाणे शहरातील एसटी बसस्थानकांवर प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा आणि स्वच्छतेबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत अचानक पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी ठाणे स्टेशन, वंदना आणि खोपट या तीन प्रमुख बसस्थानकांना भेट दिली. या पाहणीदरम्यान त्यांनी बसस्थानकांमधील प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहतूक नियंत्रण कक्ष आणि चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या सभापती तथा नगरसेविका मिनल संके यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ही पाहणी मोहीम हाती घेण्यात आली होती. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एसटी बसस्थानकावरील प्रसाधनगृहांची झालेली दुरवस्था आणि अस्वच्छता पाहिल्यानंतर मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
स्वच्छता आणि कामावर कडक निर्देश
बसस्थानकांमधील स्वच्छतेच्या कामात कोणतीही हयगय खोटेशीरपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला. संबंधित ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घेणे गरजेचे असून स्वच्छतेच्या कामावर नियमित देखरेख ठेवून तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बसस्थानक परिसरात पाडकाम झालेल्या ठिकाणचे बांधकाम साहित्य व इतर अनावश्यक वस्तू त्वरित हटवून परिसर स्वच्छ ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. तसेच नवीन बसस्थानकाचे काम कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. खोपट बसस्थानकातील उपलब्ध सोयी-सुविधांबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि विश्रांतीगृहांची पाहणी
खोपट बसस्थानकातील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाची पाहणी करताना मंत्र्यांनी तेथे विश्रांती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. बसस्थानकांची प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे सुविधांमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारचे दौरे राज्यभर व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा आणि प्रसन्न वातावरण मिळाल्यास ते अधिक उत्साहाने काम करू शकतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या या प्रतिक्रियेची दखल घेत एसटी महामंडळाचा प्रत्येक कर्मचारी हा महामंडळाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही स्वच्छ, सुरक्षित आणि आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त अशी विश्रांतीगृहे उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. खोपटप्रमाणेच स्वच्छ, नीटनेटकी आणि प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बसस्थानके राज्यातील प्रत्येक विभागात निर्माण झाली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या पाहणीदरम्यान नगरसेविका मिनल संके, नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, संजय वाघुले आणि एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk











