Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • एसटी चालकाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश
Maharashtra

एसटी चालकाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

एसटी बस आणि पोलीस प्रशासन

मुंबई | रस्तावर हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून कर्तवयावर असलेल्या एसटी चालकाला काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना दिले आहेत. एसटी चालकांशी संबंधित या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असल्याचे म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही

एसटीचे चालक आणि वाहक ऊन, पाऊस तसेच दिवस-रात्र याची पर्वा न करता लाखो प्रवाशांच्या सेवेसाठी आपले कर्तव्य बजावत असतात. अशा प्रकारे गणवेश परिधान करून शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा घटनांमुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होत असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा कर्मचाऱ्यांवर हात उगारणाऱ्या प्रवृत्तींची कोणतीही गय केली जाणार नाही. एसटी कर्मचारी कधीही एकटे नसून त्यांच्या सन्मानाला आणि सुरक्षिततेला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीला महामंडळ अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला.

पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींविरुद्ध लागू कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची पूर्ण दक्षता पोलिसांनी घ्यावी असे त्यांनी नमूद केले आहे. कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांना सामोरे जावे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी न घाबरता किंवा कोणत्याही दबावाखाली न येता तात्काळ एसटी महामंडळाच्या मुख्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. अशा कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य पुरवण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या एसटी चालक आणि वाहकांच्या कर्तव्यात अडथळा आणणे, त्यांना धमकावणे किंवा मारहाण करणे यांसारख्या गैरप्रकारांना आळा घालणे गरजेचे असून प्रत्येक परिस्थितीत महामंडळ आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts