मुंबई | मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील वाहतूक रात्री नऊ वाजल्यापासून विस्कळीत झाल्यामुळे उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. रात्रीची वेळ आणि प्रवासासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे महिला व महाविद्यालयीन तरुणी विशेष चिंतेत पडल्या होत्या. अशा कठीण परिस्थितीत कसारा येथे थांबलेली एसटी बस प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने उंबरमाळी स्थानकावर पोहोचली. एसटी चालक आणि वाहकाने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे अनेक प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा मोठा आधार मिळाला. या संपूर्ण घटनेची दखल घेऊन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचे विशेष कौतुक केले आहे.
एसटी चालक व वाहकाची तत्परता
रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने उंबरमाळी स्थानकावर चाकरमानी, विद्यार्थी, महिला आणि इतर प्रवासी मोठ्या संख्येने अडकले होते. ही परिस्थिती लक्षात घेताच कसारा येथे थांबलेल्या एसटी बसचे चालक किरण खांडवी आणि वाहक राकेश पत्की यांनी गांभीर्य ओळखून आगारातील बसस्थानक प्रमुख यांना तात्काळ माहिती दिली. तसेच अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी बस पाठविण्याची विनंती करण्यात आली. बसस्थानक प्रमुख श्रीमती पूनम देशमुख यांनी यास संमती दिल्यानंतर लालपरी तातडीने उंबरमाळी स्थानकाकडे रवाना झाली. रात्रीच्या वेळी एसटी बस उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांनी व विशेषतः नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन तरुणींनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला. सुरक्षित प्रवासाची सोय झाल्याची माहिती मिळताच प्रवाशांनी आपल्या पालकांना दूरध्वनी करून कल्पना दिली, ज्यामुळे कुटुंबीयांची चिंता देखील दूर झाली. प्रवाशांनी चालक आणि वाहकाचे आभार मानले आणि त्यानंतर ही बस सर्व प्रवाशांना घेऊन नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झाली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक
या घटनेची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालक किरण खांडवी, वाहक राकेश पत्की आणि संबंधित एसटी प्रशासनाचे अभिनंदन केले. एसटी महामंडळ ही केवळ प्रवासी वाहतुकीची सेवा नसून, अडचणीच्या प्रसंगी सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारी विश्वासाची यंत्रणा आहे, असे त्यांनी नमूद केले. प्रवाशांच्या अडचणीचे गांभीर्य ओळखून तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महामंडळाची सेवाभावी परंपरा अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन संकटसमयी मदतीसाठी पुढाकार घेणे हीच एसटीची खरी ओळख असून, किरण खांडवी आणि राकेश पत्की यांनी आपल्या कृतीतून कर्तव्यनिष्ठेचा उत्तम आदर्श घालून दिला आहे, अशा शब्दांत मंत्री सरनाईक यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
Source: Cosmo News Desk











