नागपूर | ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या आणि चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येणाऱ्या गावांना संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर जवळील लोहारी सावंगा येथे आयोजित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसोबतच्या संवादात ते बोलत होते. दुष्काळाचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले असून सरपंचांनी मांडलेल्या सर्व सूचनांवर व जलसंधारणाच्या प्रश्नांवर प्राधान्याने कामे सुरू केली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
सरपंचांची थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाच्या पोहोच पावतीची मागणी
या संवादादरम्यान नरखेड तालुक्यातील भिष्णूरच्या सरपंच श्रीमती लताताई बागडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे गावातील विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन सादर केले. विशेष म्हणजे, हे निवेदन देताना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाच्या स्थळ प्रतिवर पोहोच पावती देण्याची थेट मागणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधीने थेट मुख्यमंत्र्यांकडे पोहोच पावती मागितल्याची ही पहिलीच घटना होती. सरपंचांची ही मागणी समजून घेत मुख्यमंत्र्यांनी त्वरित ती पावती देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. सरपंच लताताई बागडे यांनी गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, जलसंधारणाच्या कामांमधील रिचार्ज शॉप्सची अयोग्य स्थिती आणि ग्रामस्थांवर होणाऱ्या विविध कामांची ग्रामपंचायतीला कल्पना नसण्याबाबतची खंत व्यक्त केली. तसेच विकासाची कामे दर्जेदार व्हावीत आणि कंत्राटदार एकच असावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विकासावरील तळमळीची भावना लक्षात घेऊन भविष्यात असे घडणार नाही, अशी ग्वाही दिली.
अटल भूजल कामांना प्राधान्य आणि दुष्काळ निवारणावर भर
या बैठकीत सरपंच लताताई बागडे यांनी अटल भूजल योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची आणि नादुरुस्त कामांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी अतिशय जागृतपणे काम करत असून गावात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मोठे समाधान व्यक्त केले.
Source: Cosmo News Desk











